रायगडच्या पालकमंत्री पदावर पुन्हा आदिती तटकरे ; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ठरले पुन्हा धुरंधर
डेली टाइम्स-7
किरण बाथम /विशेष संपादकीय
अगोदर मंत्रिपद वाटप व आता पालकमंत्री पदाचे नियोजन याचे गुऱ्हाळ प्रत्येक जिल्ह्यात सुरु होते. रायगड जिल्ह्यात देखील ते सुरु होते. काल पालकमंत्री पदावरचा राज्य शासनाचा पडदा उठला आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगडच्या राजकारण पुन्हा धुरंधर असल्याचे सिद्ध झाले.रायगडच्या पालकमंत्री पदावर पुन्हा कु.आदिती सुनील तटकरे यांची नियुक्ती जाहीर झाली.
महाराष्ट्रात पालकमंत्री पदाचा सगळीकडे कमी अधिक वाद सुरु होताच, रायगड जिल्ह्यात मागील शासन काळापासून सुरु आहे.आता पुन्हा नव्याने कायम राहणार असे दिसते.सत्तेच्या समीकरणात कर्जतचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार कालच भरत गोगावले समर्थकांनी महेंद्र थोरवे यांनी निवडून येताच माझा विजय म्हणजे तटकरेंचा पराभव आहे असे म्हणून स्वतःची विधानसभा निवडणुकी पर्यंत म्यान केलेली तलवार बाहेर काढली.अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मात्र सर्वांच्या भावना लक्षात घेऊन सामोपचाराने यामध्ये शिवसेनेच्या गोगवलेना रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाची संधी मिळावी असं नम्रपणे सुचवलं. इतकी वर्षे मंत्रिपदाला मुकलेल्या भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाले. पण कालच्या राज्य शासनाच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत पुन्हा त्यांना मागे जावे लागले.
राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे. बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, तर मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे देण्यात आली आहे. नागपूर व अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे-पाटील, वाशिम हसन मुश्रीफ, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, मुंबई उपनगर आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री), रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक उईके, सातारा शंभुराज देसाई, लातूर शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार माणिकराव कोकाटे, सोलापूर जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवाळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलडाणा मकरंद जाधव-पाटील, सिंधुदुर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुंडकर, गोंदिया बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर व माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री), गडचिरोली आशिष जैस्वाल (सहपालकमंत्री), वर्धा पंकज भोयर आणि परभणीचे पालकमंत्रीपद मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात मागील शासनकाळात मोठया घडामोडी घडल्या निवडणुकी नंतर भारतीय जनता पक्षाला बाजूला सारून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरु झाला होता. ध्वजवंदन कुणी करावे हा प्रश्न तेव्हा देखील निर्माण झाला होता. तत्कालीन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते तेव्हा रायगडमध्ये प्रशासकीय मानवंदना झाली होती.
पुन्हा महाराष्ट्र सोडला तर रायगडच्या राजकीय पटलावर पालकमंत्री पदावरून पुन्हा नवा वाद त्याच वळणावर आला आहे. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आता सत्तेची समीकरणे भाजप 3,शिवसेना3 तर राष्ट्रवादी 1 अशीच आहे. फक्त सेना-राष्ट्रवादी आपापल्या पातळीवर विभागले गेले आहेत.खासदार तटकरे पुन्हा रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या काळात देखील शिवसैनिक खूप आक्रमक झाले होते. माणगावला जुन्या शिवसेनेचा मेळावा झाला होता. तेव्हा मंत्री असलेले आदित्य ठाकरे मेळाव्यात आले होते.जुने राजकारण माहिती असलेल्या जाणकारांना बॅ. अंतुले यांचा काळ तेव्हा आठवला होता.तेव्हा शेकाप-काँग्रेस कार्यकर्ते असा प्रचंड संघर्ष असायचा मुंबई मधून अंतुले अलिबागला जातांना त्यांच्या सोबत काँग्रेस कार्यकर्त्यांचा ताफा असायचा. पेझारी आल्यावर त्यांच जेवण कै. प्रभाकर पाटील यांच्या घरी व्हायचे आणि काँग्रेस कार्यकर्ते दात ओठ खात रस्त्यावर साहेबांची वाट बघत असायचे.तेव्हा सुनील तटकरे काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून बॅ. अंतुले यांच्यासह असायचे.पाच वर्षे पूर्वी आदित्य ठाकरे तसेच माणगावचा शिवसेना मेळावा आटोपून थेट तटकरे यांच्याकडे पाहुणचार घेऊन गेले होते.
काल रात्रीच काही शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गांवर आपला संताप व्यक्त केला.आता हा नव्याने निर्माण झालेला राजकीय संताप कोणत्या मार्गांवर जातो हे येणारा नवा काळ ठरवेल.
शिंदे गट काहीही करू शकत नाही.मागेही तेच झाले आत्ता ही तेच झाले.सत्याचा विजय झाला.